‘शासन आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी जिल्ह्यात शुभारंभ
पुणे दि. २६ : जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी ‘शासन आपल्या दारी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातून करण्यात आला. हा उपक्रम पुणे जिल्ह्यात पुढील दहा दिवस राबविण्यात येणार आहे.government-at-home
इंदापूर तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात ‘सिल्क समग्र – २ या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ५८ अनुदान प्रस्तावांपैकी २५ प्रस्तावांना पूर्वसंमती देण्यात आली व ३३ प्रस्तावांतील त्रुटी, कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर मनरेगा योजनेअंतर्गत तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले
रेशीम शेती उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगा व सिल्क समग्र -२ या दोन योजनेतून अनुदान दिले जाते. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांकडून या दोनपैकी त्याने निवडलेल्या योजनेच्या अनुदानाचे अर्ज भरुन घेणे, कागदपत्रांची तपासणी करून पूर्तता करून घेणे व त्याच ठिकाणी त्याच दिवशी प्रस्तावांना पूर्व संमती आणि मंजूरी देण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे.
यावेळी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक प्रमोद शिरसाठ, एस. एम. आगवणे, क्षेत्र सहाय्यक बी. डी. माने, एस. आर. तापकीर, मनरेगाचे कंत्राटी तांत्रिक कर्मचारी प्रदीप कदम आदी उपस्थित होते.
संजय फुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे रेशीम शेतीसाठी इच्छुक शेतकऱ्यांच्या अनुदान प्रस्तावांना एकाच छताखाली मंजूरी दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा वाचणार असून शेतकऱ्यांना हंगामात तुती लागवड करता येऊन वेळेत रेशीम उत्पादन घेता येतील. त्यायोगे जिल्ह्यात रेशीम शेती उद्योग वाढीस चालना मिळणार आहे.government-at-home