देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी मोहीम.. दुभंगलेल्या ओठांसह जन्मलेल्या बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य !
महाराष्ट्रात दरवर्षी दुभंगलेले ओठ व टाळू घेऊन काही हजार बालके जन्माला येतात. या बाळांच्या व त्यांच्या माता-पित्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. यासाठी राज्यातील अशा सर्व बाळांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना उपमुख्यमंत्र्यांनी हाती घेतली आहे.
दुभंगलेले ओठ आणि टाळू घेऊन ४० हजार बालकं जन्माला येतात
जन्मता दुभंगलेले ओठ व टाळू घेऊन या देशात सुमारे ४० हजार बालके दरवर्षी जन्माला येत असतात. महाराष्ट्रात हेच प्रमाण सुमारे दोन हजार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा बाळांच्या ओठांची चार महिन्यानंतर तर टाळूची आठ महिन्यांच्या अंतराने शस्त्रक्रिया करणे अपेक्षित असते. साधारणपणे अशा बाळांच्या दोन ते तीन शस्त्रक्रिया कराव्या लागतात. तसेच त्यांच्या बोलणे व ऐकण्यातील अडथळे दूर करण्याचे ही काम करावे लागत असल्याचे जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील मानद प्राध्यापक तसेच बॉम्बे इस्पितळातील ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन मोकल यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा अशा बाळांच्या शस्त्रक्रिया करण्याचे मिशन हाती घेतले तेव्हा या मिशनचे समन्वयक म्हणून त्यांनी डॉ. नितीन मोकल यांनी नियुक्ती केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीविषयी विचारले असता डॉ. मोकल म्हणाले, हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे.
पूर्वी आपल्याकडे फार कमी प्रमाणात दुभंगलेल्या ओठ व टाळूंवरील शस्त्रक्रिया व्हायच्या. कारण त्यावेळी पुरेसे प्लास्टिक सर्जन उपलब्ध नसायचे. आता परिस्थिती बदलली असली तरी दरवर्षी जन्माला येणाऱ्या बाळांचे प्रमाण व त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या किमान दोन ते तीन शस्त्रक्रिया यांचा विचार करता हा प्रश्न आजही गंभीर म्हणावा लागेल. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा एक उत्तम समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला असून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण तसेच महिला व बालविकास आदी विभागाच्या सहकार्याने अशा मुलांचा शोध घेऊन राज्यभर शस्त्रक्रिया केल्या जातील. आजघडीला राज्यात सुमारे अडीचशे प्लास्टिक सर्जन असून अमेरिकास्थित ‘स्माईल ट्रेन’ संस्थेच्या तसेच अन्य काही सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून आम्ही शस्त्रक्रिया करू.
अशा जन्मलेल्या बाळांच्या शस्त्रक्रिया करणे हे जरी आव्हान असले तरी मुळातच अशा बाळांचा जन्म होऊ नये यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे असून त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे डॉ. लहाने म्हणाले. दोन दशकांपूर्वी याबाबत फारशी जागृती नव्हती व शस्त्रक्रिया करणाऱ्यांची संख्याही खूप कमी होती. काही वर्षांपूर्वी ‘स्माईल पिंक’ या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला तेव्हा दुभंगलेले ओठ व टाळूंचा विषय चर्चेत आला होता. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दुभंगलेले ओठ व टाळू घेऊन जन्माला येणाऱ्या बालकांच्या शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. अलीकडेच मौखिक आरोग्याची राज्यव्यापी मोहीमही त्यांनी हाती घेतली आहे तर मुख्यमंत्री असताना मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राची मोहीम राबवून सुमारे सतरा लाख शस्त्रक्रिया त्यांच्या अधिपत्याखाली झाल्या होत्या.
devendra-fadnavis