पुस्तकाचे नाव – तत्त्वमसि – Book Review
पुस्तकाचे नाव – तत्त्वमसि
लेखक – ध्रुव भट्ट
मराठी अनुवाद – अंजनी नरवणे
‘ गंगा , यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा , कावेरी, भागीरथी ‘, लहानपणापासून रोज सकाळी वडिलांनी स्नान करताना घेतलेली नद्यांची ही नावे कानी पडणं ठरलेलं . म्हणून लहान वयातच नकळतपणे भारतातील प्रमुख नद्यांची नावे पाठ झाली. हाच नर्मदेचा पहिला परिचय ! पुढे शाळेत एक शिक्षक आम्हां विद्यार्थ्यांना म्हणायचे , ‘ नर्मदेतील गोटे आहेत रे गोटे !’ हि नर्मदेची आणखीन एक ओळख. पुढे अभ्यासक्रमात नर्मदेची भौगोलिक दृष्ट्या ओळख झाली.
भारताच्या मध्यभागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी ही नदी . उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी. १३१२ किमी लांबी असणारी ही रेवा मध्यप्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते आणि गुजरातमधील भरूच जवळील खंबातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते . मध्यप्रदेश आणि गुजरातची ही जीवनदायिनी !
सांस्कृतिकदृष्ट्या भारतीय संस्कृतीत नर्मदेचे मोठे महत्व आहे. पुराणानुसार गंगेपेक्षाही प्राचीन नर्मदा नदी आहे. एका आख्यायिकेनुसार एकदा महादेव तांडव करता करता घामाघूम झाले आणि त्यांच्या घामाची धारा प्रवाहित होऊन नर्मदेचा जन्म झाला. शिवलिंग म्हणून पूजेचा मान नर्मदेतील लांब गोलाकार दगडांनाच ! ‘ नर्मदा के कंकर कहलाते है शंकर’ ही मान्यता. गंगेच्या स्नानाने पापमुक्ती होते तर नर्मदेच्या केवळ दर्शनाने ! असा समज आहे की वर्षभर लोकांचे पाप धुवून गंगा मैली होते आणि ही मैली झालेली गंगा गाईच्या रूपात येऊन नर्मदेत स्नान करून स्वच्छ होते आणि पुन्हा लोकांचे पाप धुवायला सज्ज होते.
भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्व असलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे ‘नर्मदा परिक्रमा’! पूर्वी मी फारसं कधी ह्या परंपरेबद्दल ऐकलं नव्हतं . पण आता कदाचित social media मुळे कधी फोटोजच्या माध्यमातून तर कधी एखाद्या travel agency च्या माध्यमातून नर्मदा परिक्रमा सतत नजरेसमोर येतं होती. पायी प्रदक्षिणा आणि तीही नदीची ? १३१२ किमी लांबीची ही नदी. परिक्रमा पूर्ण करण्यासाठी रस्त्यात येणारे डोंगर-दऱ्या , नव्याने झालेली धरणक्षेत्रे हे सर्व अंतर धरून ३०००किमी पेक्षा जास्त अंतर पार करावं लागतं . परिक्रमा करणारा माणूस नर्मदेच्या किनाऱ्यावरील कुठल्याही एका ठिकाणापासून यात्रा सुरु करतो आणि नदीच्या उगमस्थानी अमरकंटक ला पोहोचतो . तेथे उगमकुंडाला ओलांडून पलीकडच्या किनाऱ्यावर जातो आणि तेथून नर्मदा जिथे सागराला मिळते तेथील प्रदक्षिणा करून ज्या ठिकाणाहून त्याने यात्रा सुरु केली होती तिथे येऊन पोहचतो . ह्या सर्व प्रवासात नर्मदा कुठेही ओलांडायची नाही हा नियम !
वेळ आणि शारीरिक क्षमतेनुसार हि यात्रा वेगवेगळ्या प्रवासाच्या माध्यमांनी केली जाते. पण पायी केलेल्या परिक्रमेचे महत्त्व खूपच अधिक सांगितले आहे. कदाचित डोंगर दऱ्या, जंगलातून एवढी खडतर यात्रा करताना येणाऱ्या विविध अनुभवांमुळे शेवटी ‘अहं ‘ निघून जात असेल आणि त्यामुळे पायी परिक्रमेचे अधिक महत्व असेल. पायी परिक्रमा करताना प्रत्यक्ष नर्मदा माता मनुष्य रूपात दर्शन देते अशी परिक्रमावासींची श्रद्धा असते.
एकूणच ह्या यात्रेबद्दल मला खूप आश्चर्य आणि कुतूहल वाटत होतं . म्हणून ह्यावर काही वाचता येईल का यासाठी थोडी शोधाशोध केली. तेव्हा गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘तत्त्वमसि’ हि एक अतिशय सुंदर कादंबरी हाती लागली. हि कादंबरी प्रत्यक्षात जरी परिक्रमेबद्दल नसली तरी नर्मदा आणि तिची परिक्रमा हा नर्मदेच्या खोऱ्यातील संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्यामुळे कथेत त्याबद्दल सतत संदर्भ आहेत.
परदेशात राहत असलेला कथानायक १८ वर्षांनी भारतीय आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात परत येतो. अनेक वर्ष परदेशात राहून आल्यामुळे त्याला येथील अस्वच्छता, अंधश्रद्धा , देवभोळेपणा अशा अनेक गोष्टी खटकत असतात. त्याचबरोबर कमालीची विविधता असलेल्या ह्या देशात समाजातील छोट्या घटकापासून उच्चं स्तरापर्यंत , विविध जाती धर्मांना जोडून ठेवणारे काहीतरी साम्य त्याला जाणवते . हे साम्य शोधण्याचा प्रयत्न कथानायक करत असतो. कथेत शेवटपर्यंत कथानायकाचे नाव कुठेही येत नाही. आपला project पूर्ण करण्यासाठी तो नर्मदेकाठच्या जंगलातील एका आदिवासी आश्रमात जातो आणि तेथील वास्तव्यात त्याचे आयुष्यच बदलून जाते.
लेखकाने नर्मदा नदी, त्या काठची जंगलं , आदिवासी जीवन , त्यांची संस्कृती ह्या गोष्टी इतक्या छान प्रकारे मांडल्या आहेत की आपणही पुस्तक वाचताना त्या प्रदेशात पोहचतो. विशेष म्हणजे पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना लेखिकेने बऱ्याच अंशी आदिवासी बोलीभाषेतील संवाद अनुवादित न करता तसेच ठेवले आहेत, म्हणून ती बोलीभाषा देखील आपल्या पर्यंत पोहचते.
उच्चशिक्षीत असूनही जंगलात राहून आदिवासींसाठी काम करणारी सुप्रिया; आश्रमाचं काम पाहणारे आणि गरीब आदिवासी आपले पैसे परत करू शकणार नाहीत हे माहिती असूनही त्यांना पैसे उधार देणारे गुप्ताजी; दुर्गम अरण्यात राहूनही आपली संगीतसाधना जोपासणारे, आदिवासींवर औषोधोपचार करणारे ज्ञानी शास्त्रीजी; गोड गळ्याची, स्वाभिमानी आदिवासी तरुणी पुरिया; अशिक्षित असूनही engineering techniques वापरणारे बित्तु -बंगा हि भावंड ; नर्मदेच्या जंगलात फिरणारा आणि आदिवासींवर प्रेम करणारा मुस्लिम वेडा फकीर – ही या कादंबरीतील मुख्य पात्र .
नर्मदा आणि नर्मदा परिक्रमेला कुठलेही धार्मिक रंग या कादंबरीत दिले नाहीत. नर्मदा परिक्रमा हि धार्मिक पेक्षा सांस्कृतिक परंपरा कशी आहे हेच लेखकाने आपल्याला दाखवून दिले आहे. ऋषी मुनींनी पाडून दिलेली हि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी परिक्रमेच्या मार्गातील अनेक मंदिरं , खेड्यापाड्यातील कुटूंब , गरीब भोळे आदिवासी परिक्रमावासींची सेवा करतात. अशी सेवा करणं ते आपलं कर्तव्य मानतात. शेवटी संस्कृती, परंपरा टिकल्या तरच धर्म टिकेल !
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘रेवा’ हा गुजराती चित्रपट ‘तत्त्वमसि ‘ या कादंबरी वर आधारित आहे. मूळ कथानकात काही बदल केलेले असले तरी ‘रेवा’ हा एक छान चित्रपट आहे. ज्यांना पुस्तक वाचणं जमलं नाही त्यांनी ‘रेवा’ नक्की बघावा.
आदिवासी समाज जीवन, भारतीय संस्कृती आणि आध्यात्माची आवड असणाऱ्यांनी ‘तत्त्वमसि ‘ नक्कीच वाचावं !
नर्मदे हर !