आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे
तिरंगा आणि राजमुद्रा…
आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे.
पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली आणि त्याजागी आपल्या लाडक्या, जाणत्या राजाची, शिवछत्रपतींच्या राजमुद्रेच्या आकारातील नवी निशाणी स्थापित झाली!
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण नौदलाच्या ध्वजात आजही ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता.
आज भारतीय नौदलाला नवा ध्वज प्राप्त झाला आणि त्याचे अनावरण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले.
सर्वात आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, हा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आले आहे.
सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्याकाळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव आज यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झाला!
जगभरातील शिवभक्त, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच महाराजांच्या राजमुद्रेने नौदलाच्या ध्वजावरील पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली गेली.
॥ जय भवानी जय शिवाजी ॥
॥ जय जिजाऊ जय शिवराय ॥