कोण आहेत भगवान नृसिंह ..
lord-narsinha
संस्कृत मध्ये नर म्हणजे मनुष्य आणि सिंह म्हणजे सिंह प्राणी ,विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नरसिंह. ज्यांनी हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी पृथ्वीवरील छळ संकटे संपवण्यासाठी त्याद्वारे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, अर्धसिंह अर्ध मानवी अशा रुपात अवतार घेतला होता.नरसिंहाचे चित्र तीन डोळ्यांनी चित्रित केले जाते. नरसिंहाचे वर्णन योग नरसिंहाच्या रूपात योगाचा देव म्हणून केले जाते .
हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता. जो खूप शक्तिशाली होता, त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते, ज्यामुळे दिवसा किंवा रात्री घराच्या आत किंवा बाहेर मारले जाऊ शकत नव्हते. ना आकाशात, ना भूमीवर, ना स्वर्गात न पाताळात ना कुठल्या शास्त्राने ना माणसाच्या हाताने, देवाने, असुराने किंवा प्राण्याने कशानेही त्याला मरण नव्हते. या वरदानाने संपन्न झालेल्या त्याने पृथ्वीवर अराजकता माजवायला सुरुवात केली, आणि स्वतःच्या मुलासह सर्व विष्णू भक्तांचा छळ सुरू केला .
भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्तीसाठी ओळखला जातो तर हिरण्यकश्यपु आपल्या मुलाच्या विष्णूवरील भक्ती मुळे इतका संताप्त आणि नाराज झाला की त्याने प्रल्हादाला आपला आपला शत्रू म्हणून पाहिले. त्यांनी ठरवले की आता आपण ह्याला मारले पाहिजे पण प्रत्येक वेळी हिरण्यकश्यपुने आपल्या मुलाला म्हणजेच प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने त्याला संरक्षण दिले. जेव्हा भक्त प्रल्हादाने विष्णू सर्वव्यापी असल्याचा दावा केला तेव्हा हिरण्यकश्यपुणे एका खांबाकडे अंगुली निर्देश करत विचारले या खांबात तुझा देव आहे का?
हे विचारत त्याने तो खांब हलवला तेव्हा श्रीविष्णू सिंहाच्या रूपात तुटलेल्या स्तंभातून प्रकट झाले आणि जो अवतार काही अंशी मनुष्य तर काही अंशी प्राणी होता.त्याने हिरण्यकश्यपुवर संधी प्रकाशात म्हणजेच जेव्हा दिवसही नाही आणि रात्रही नाही. अंगणाच्या उंबरठ्यावर म्हणजे घरात नाही आणि बाहेरही नाही अशा प्रकारे हल्ला केला. असुराला त्याने त्याच्या मांडीवर ठेवले आणि पंजाचा वापर करून त्याचा वध केला.
हिरण्यकश्यपुच्या मृत्यूनंतर उपस्थित देवदेवतांपैकी कोणीही नृसिंहाचा राग शांत करू शकले नाही म्हणून सर्व देवी देवतांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच देवी लक्ष्मीला बोलवले, परंतु ती देखील असे करण्यास असमर्थ होती.मग ब्रह्मदेवाच्या विनंतीनुसार, प्रल्हादाला नरसिंह समोर हजर करण्यात आले. शेवटी त्यांचा रोष भक्ताच्या प्रार्थनेनेच शांत झाला.