स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती गठीत
पुणे दि. 23 मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकते, वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर यल्लाप्पा जाधव, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिथिलेश हराळे ,निवासी वैद्यकीय अधिकारी रुपेश चाफे उपस्थित होते.
अपघातग्रस्त रुग्णांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख म्हणाले, रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघाताबाबत आढावा घेण्यात आलेला आहे.
येथे होणाऱ्या अपघाताची कारणे शोधण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्याबाबत सेव लाईफ फाउंडेशन या संस्थेला काम देण्यात आले होते. या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी स्ट्रीप्स लावणे, रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे ,वेग मर्यादेवर नियंत्रण करणे इत्यादी उपायोजना केल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देखील याबाबत सूचना देण्यात आले असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने काम करण्यात येत आहे.
अपघाताची तीव्रता लक्षात घेता या घटनेची चौकशी करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केल्याचे आदेश डॉक्टर देशमुख यांनी निर्गमित केले आहे .
या समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सदस्य प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.