पुण्यापासून जवळ आहे हे अतिप्राचीन शिव मंदिर.. नक्की दर्शन घ्यावे असे ठिकाण
पुण्यापासून जवळ एक दिवसीय सहल.. bhuleshwar-pune
पुण्यापासून जवळ आहे हे अतिप्राचीन शिव मंदिर.. एक दिवसीय साहिलीसाठी अगदी उत्तम ठिकाण
भुलेश्वर…. एक अतिप्राचीन मंदिर…. अस वर्णन आम्ही ऐकल होत, पुण्यापासून 45किमी अंतरावर असलेले हे ऐतिहासिक ठिकाण यवत गावापासून 700फुट ऊंची वर आहे. या विकेंडला कुठेतरी फिरायला जाण्याचा आमचा प्लॅन भुलेश्वर मंदिरात जाण्यावर फायनल झाला आणि तिकडे पोहचल्या नंतर तो परिसर, तिकडच शांत वातावरण म्हणजे रोजच्या धावपळीच्या आयुष्यात काही तासांसाठीची रिफ्रशमेंट….याठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील कोरीव काम सुंदर आहे. एकदा तरी भेट द्यावी अस हे ठिकाण आहे. bhuleshwar-pune
भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण “मंगलगड” असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता.
मंदिराची शैली –
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
मंदिराचा गाभारा –
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.bhuleshwar-pune
कसे जाल –
पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. तसेच यवत सासवड ही बस ही यवत वरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते .
Pune – Swargate – Hadapsar -yawat – Bhuleshwar
https://goo.gl/maps/egaKeAKo6mhGAfJe9