जाणून घ्या रांगोळी बद्दल च्या काही “खास”गोष्टी
रांगोळी हा तीन अक्षरी शब्द पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे.ती एक सुंदर कला आहे. विविध रंगांची उधळण करत काढलेली रांगोळी घरातील मंगलमय वातावरणाची साक्ष देते . सध्या मोठया शहरातील फ्लॅट संस्कृतीत सुद्धा जागेच्या अभावामुळे तिचा आकार लहान झाला असला तरी तिचे अस्तित्व मात्र कायम आहे .janun-ghya-rangoli-baddal
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. रांगोळीचे प्राचीन भारतीय संस्कृतीशी नाते असून पुरातन काळापासून रांगोळीचे अस्तित्व असल्याचे बोलले जाते. चित्रकलेचा उगमही रांगोळी पासूनच झाला. तिच्यामध्ये कालानुरूप बदल होत गेले. आदिवासी जमातींना भुरळ पाडणारी रांगोळी उत्तर भारतात रंगोली तर गुजरात मध्ये साथिया म्हणून ओळखली जाते. janun-ghya-rangoli-baddal
दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस भू अलंकरण दिन म्हणून साजरा केला जातो .आपल्या पृथ्वीविषयी आदर,सन्मान व आत्मीयता प्रकट करण्याचा हा दिवस साजरा करण्याचा मानस संस्कार भारती या संस्थेने २०१७ साली मांडला.भारतीय संस्कृतीत रांगोळी ही कला प्राचीन कला म्हणून ओळखली जाते. ही कला म्हणजे आपल्या पृथ्वीचे, धरणी मातेचे आभूषण,अलंकार म्हणून ओळखले जाते.
रांगोळीला तसा बराच मोठा इतिहास आहे. प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की, कलात्मक चित्रांनी शहर आणि गावं धनधान्याने समृद्ध राहतात आणि जादुई प्रभावापासूनही सुरक्षित राहतात. याच दृष्टीकोनातून अल्पना धार्मिक आणि सामाजिक समारंभांच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली. रांगोळीचा उल्लेख आर्य युगातही आढळतो.
आत तर रांगोळीमध्ये अनेक नव-नवीन प्रकारांचा शोध लागला आहे. पूर्वी शंख जीऱ्याची पूड करून तिला भाजून त्यामध्ये तांदुळाची पिठी टाकून रांगोळी तयार केली जात होती. नंतर त्यामध्ये वेगवेगळे रंग मिसळून रंगीत रांगोळी तयार केली जाऊन तिचा वापर वाढला आणि आता तर पाने-फुले, सजावटीच्या वस्तू (शंख-शिंपले, काच-मोती) यांचा वापरही रांगोळी काढण्यासाठी केला जात आहे. रांगोळीच्या साहित्यात झालेल्या बदलाबरोबरच तिच्या प्रकारातही वैविध्य आले आहे.
देवदेवतांची चित्र रेखाटण्याची प्रथा पूर्वीपासूनच रंगोलीमध्ये आहे. परंतु आता ठिपक्यांच्या रांगोळीबरोबरच निसर्गाची विविध रुप तसेच व्यक्तींची रूपही रांगोळीमधून रेखाटण्यात येत आहेत. संस्कारभारती हा प्रकार आजही रांगोळीमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे. अशा ह्या रांगोळीतून भारतीय संस्कृतीचे वेगळेपण जाणवते. सण-समारंभाच्या निमित्याने आजही घरासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात.
मध्य प्रदेशात चौकपूर्णा तर राजस्थानात मांडणा नावाने ओळखली जाणारी घराच्या उंबरठ्यावर काढलेली रांगोळी अशुभशक्ती घरात येऊ देत नाही व शुभशक्तींना घराबाहेर पडण्यास अडथळा आणते अशी समजूत आहे.
घरासमोरील रांगोळी अंगण सुशोभित करून मन प्रसन्न करते. ही रांगोळी काढण्यासाठी दररोज सकाळी काही मिनिटे द्यायचं ठरवलं तर घरातील मांगल्य कायम राहील आणि संस्कृती संवार्धानालाही हातभार लागेल. या रांगोळीचं आयुष्य अगदी काही क्षणांचं असलं तरी त्यामागील भावना महत्त्वाची मानली जाते.
–श्वेता विनायक